दुष्काळात तेरावा महिना, पीकविम्याच्या ऑनलाईन प्रणालीत अडचणी!

editor 2 Min Read
2 Min Read

मेहकर (शिवशंकर तांगडे) – पीकविम्याच्या ऑनलाईन प्रणालीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून, अनेक शेतकर्‍यांनी परतीचा पाऊस व अतिवृष्टी यामुळे सोयाबीनसह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची तक्रार ७२ तासांच्याआत क्रॉप इन्शुरन्स अ‍ॅपवर नोंदवलेली आहे. परंतु, फक्त ३० टक्के शेतकर्‍यांचीच नावे पंचनाम्यासाठी समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे इतर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. याबाबत पीकविमा कंपनीच्या अधिकारी, प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकर्‍यांत संतापाची लाट निर्माण झालेली आहे.

मेहकर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगाम २०२२ चा पीकविमा भरलेला आहे. यावर्षी सोयाबीन काढणीस आल्यापासून ते आजपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे. तालुक्यातील सर्वच भागात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ७२ तासाच्याआत तक्रार देणे गरजेचे आहे. त्यानुसार अनेक शेतकर्‍यांनी ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स अ‍ॅप वरून तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु पंचनाम्यासाठी त्यापैकी ३० टक्के शेतकर्‍यांचेच फक्त नावे यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. याबाबत क्रॉप इन्शुरन्स कंपनी प्रतिनिधींना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

त्यामुळे राहिलेले शेतकरी संभ्रमात आहेत, की ऑनलाईन अर्ज ७२ तासांच्याआत करूनसुद्धा अद्यापही यादीमध्ये नाव आलेले नाही. तसेच तक्रार देऊन आज जवळजवळ एक महिना होत आला असूनसुद्धा यादीमध्ये नाव कसे नाही, यामुळे आता पीकविम्यास मुकावे लागणार की काय, असे शेतकर्‍यांना वाटत आहे. त्यामुळे महसूल व कृषी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Share This Article
Exit mobile version