ग्रामस्थांसह तीन पोलिस जखमी
गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) – गोंदिया जिल्ह्यातील अवैध वाळूतस्करी आणि या तस्करांच्या गुंडगिरीविरोधात ग्रामस्थच आता रस्त्यावर उतरले असून, महालगाव-मुरदाडा येथील अपघाताला हिंसक वळण लागले आहे. अवैध वाळूतस्करी करणार्या टिप्पर व ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात बुधवारी (दि.१५) चालक ठार तर दुसर्या दिवशी अन्य एक जण मृत्युमुखी पडल्यानंतर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर या आंदोलनाला िंहसक वळण लागले. काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनीही अमानुष लाठीचार्ज केला. त्यात तीन पोलिसांसह अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळतस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात काल बुधवार, १५ जून रोजी झाला होता. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. पहिला मृतदेह घेवून ग्रामस्थांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यावर धावा बोलला तर आज गुरुवार, १६ जून रोजी दुसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की पोलिसांनी लाठीचार्ज केला तर प्रत्युत्तरात संतप्त ग्रामस्थांनी पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. या मध्ये तीन पोलिस जखमी झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.

