वर्धा (विशेष प्रतिनिधी) – सायंकाळी गजबज राहात असलेल्या शहराच्या मध्यभागातील महावीर उद्यानात सुरक्षा रक्षकाने महिला सुरक्षा रक्षकावरच अॅसिडहल्ला केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.रात्री ८वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत महिला सुरक्षा रक्षक जखमी झाली.तिच्या पाठीवर तसेच मानेवर जखमा झाल्या आहेत.पोलिसांनी अॅसिडहल्ला करणारा सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. जखमी महिलेला सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांसह विविध पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल दाखल झाले. हा हल्ला झाला तेव्हा महावीर उद्यानात सहकुटुंब फिरायला आलेल्या नागरिकांची गजबज होती. तर हल्ला झालेली सुरक्षा रक्षक महिला तिकिट काऊंटरवर काम करीत होती. त्याचवेळी या चाफले आडनावाच्या सुरक्षा रक्षकाने अॅसिडहल्ला केला. उपस्थितांनी तातडीने जखमी महिला सुरक्षा रक्षकाला रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमी महिला सुरक्षा रक्षकाचे बयाण नोंदविणे सुरू होते.

