उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा दुर्देवी आणि अन्यायकारक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तांडे, वस्त्यांवरील शाळा बंद होऊन गोरगरीब, भटके-विमुक्त, बहुजनांच्या मुला-मुलींचे अतोनात शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तांडा, वसतींवरील शाळा बंद करू नयेत, यासाठी समविचारी संघटना मैदानात उतरल्या असून, याबाबत उमरगा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. महिला सत्ता आंदोलन, महाराष्ट्र लोक विकास मंच, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि वंचित बालविकास मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
या समविचारी संघटनांच्यावतीने उमरगा येथील तहसीलदार यांना वस्ती शाळा, तांड्यावरील पट कमी असल्याच्या कारणावरून शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्षा महिला राजसत्ता आंदोलन विद्या वाघ, जिल्हा उपाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड सुनंदताई माने, उपाध्यक्ष महाराष्ट्र लोक विकास मंच भूमिपुत्र वाघ, सचिव मराठा सेवा संघ रंजीता पवार उपाध्यक्ष वंचित बालविकास मंच महाराष्ट्र, निखिल वाघ राज्य समन्वयक ऊसतोड कामगार संघटना, रेखाताई सूर्यवंशी प्रवत्तäया जिजाऊ ब्रिगेड, अनिलभाऊ सगर शहर प्रमुख मराठा सेवा संघ, रेखाताई पवार जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, सोबत कृष्णा पाटील, प्रशांत ढवळे, विद्या मार्कड यांच्यासह तालुक्यातील नारंगवाडी, मुरूम, आदी गावातील ७५ लोक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

