लोहारा अपघातातील गंभीर जखमी युवतीची आ. बनसोडे यांनी घेतली भेट

editor 2 Min Read
2 Min Read

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – उदगीर तालुक्यातील लोहारा गावाजवळ तुळजापूर येथून देवीचे दर्शन घेऊन उदगीरला परत येत असताना आज सकाळी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जीव गेला तर यातील तर एक तरुणी गंभीर जखमी झाली होती. याबाबतची माहिती कळताच उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी सामान्य रुग्णालय उदगीर व पोलीस प्रशासनाला अपघातग्रस्तांना तातडीने मदतीच्या सूचना केल्या. तसेच, गंभीर जखमी प्रियंका बनसोडे हिची लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जावून विचारपूस केली, व आरोग्य प्रशासनाला योग्य उपचाराच्या सूचना केल्या आहेत.

या अपघातात मयत झालेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना आमदार बनसोडे यांनी धीर देत, आपण तुमच्यासोबत असल्याचे सांगून मयताचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांना तातडीने देण्याच्या सूचना सामान्य रूग्णालयातील आरोग्य विभागाला दिल्या होत्या. या अपघातात प्रियंका बनसोडे ही तरुणी जखमी असून तिला तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयातून लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. आज आमदार संजय बनसोडे हे बेंगळुरू येथे गेले होते, मात्र त्यांना आपल्या मतदारसंघात हा गंभीर अपघात झाल्याचे वृत्त समजताच ते तातडीने बेंगळुरू येथून थेट लातूरला आले व जखमी असलेल्या प्रियंका बनसोडे व त्यांच्या नातेवाईकांना लातूर येथील शासकीय रूग्णालयात प्रत्यक्ष भेटून त्यांना धीर दिला, आणि आर्थिक मदत करून रुग्णालयातील डॉक्टरांना योग्य ते औषध उपचार करावा, व कुठलीही निष्काळजी न करता उपचार करण्यासाठी सूचनाही त्यांनी केली. यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्यासोबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ.हनुमंत किनीकर, प्रशांत पाटील, व नातेवाईक उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version