खामगाव (तालुका प्रतिनिधी) – तब्बल ७० वर्षे वयाच्या नराधमाने अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची भयानक घटना खामगाव ग्रामीण पोलिस ठाणेहद्दीत घडली आहे. रामकृष्ण उखर्डा गवई असे या नराधमाचे नाव असून, खामगाव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या नराधमाविरुद्ध पोस्कोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेने खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे.
सविस्तर असे, की खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत राहणार्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीला रामकृष्ण उखर्डा गवई याने घरी चल आपण खेळू, असे म्हणत आपल्या राहत्या घरी नेले. यानंतर त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती मुलीने तिच्या आईला दिल्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने हंबरडा फोडल्यानंतर शेजारीपाजारी गोळा झाले. त्यानंतर या दुर्देवी आईने खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

