वैजापूरचे आ. बोरनारे यांच्याविरोधात भावजयीचे गंभीर आरोप

editor 2 Min Read
2 Min Read

वैजापूर (तालुका प्रतिनिधी) – वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात त्यांच्या भावजयीने पुन्हा एकदा गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून, त्यांचा गृहकलह परत एकवेळ चव्हाट्यावर आला आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. आ. बोरनारे यांच्या आईसमान भावजयी यांना त्यांनी शिवीगाळ केली तर त्यांच्या भावकीतील लोकांनी पती, मुलगीसह त्यांना मारहाण केली, अशी तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलिसांत दाखल केली आहे. नेहमीप्रमाणे अद्याप तरी पोलिसांनी या तक्रारीवर काहीही कार्यवाही केली नव्हती.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे भावजयीला मारहाण, शिवीगाळ प्रकरणी सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. परंतु, वैजापूर पोलिस त्यांच्या भावजयीच्या तक्रारीवर कार्यवाही करायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आतादेखील बोरनारे यांच्या भावजयी जयश्री बोरनारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, की त्या उक्कडगाव देवीचे दर्शन घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी परत आल्या असता, त्यांना आ. बोरनारे यांनी मद्य प्राशन करून शिवीगाळ केली. तसेच, आमदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या भावकीतील प्रवीण विठ्ठल बोरनारे, सुनीता विठ्ठल बोरनारे, ज्योती दिनेश बोरनारे, दिनेश शाहू बोरनारे यांनी जयश्री बोरनारे, त्यांचे पती आणि मुलीला मारहाण केली. तरी, आपल्या तक्रारीची दखल घेऊन आ. बोरनारे यांच्यासह आपणासह पती व मुलीस मारहाण करणार्‍या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. हे वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नव्हती.
—————

Share This Article
Exit mobile version