लांबोट्यात वीज पडून महिलेसह म्हैसही दगावली

editor 2 Min Read
2 Min Read

– निलंगा परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
– ऊस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी हादरले

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसात म्हशीला घेऊन येणारी महिला वीज पडून ठार झाली आहे. तर कलांडी येथे वीजेने एका बैलाचा बळी घेतला आहे. या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे आपल्या शेतात म्हैस घेऊन घराकडे जात असलेली महिला उषाबाई लक्ष्मण आवटे (वय ४५) यांच्यासह त्यांच्या म्हशीवर वीज पडल्याने दोघीही जागीच ठार झाल्यात. तर कलांडी येथील शेतकरी व्यंकट राम सूर्यवंशी यांचा बैल वीज पडून ठार झाला आहे. आज (दि.२८) सायंकाळी अचानक निलंगा शहरासह परिसरात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला आणि, यात लांबोटा येथील उषाबाई आवटे ह्या म्हैस चारत आपल्या घराकडे येत असताना त्या दोघींवर वीज कोसळली. त्यात सदरील महिलेचा व त्यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. या महिलेचे प्रेत निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, एक मुलगा व मुलगी असा परिवार असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.


अचानक वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्यातील ताजपूर येथे अनेक शेतकर्‍यांचा ऊस आडवा पडला होता. शेकडो हेक्टरवरील ऊस आडवा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर या मुसळधार पावसाने अनेक शेतकर्‍यांचे काढणीला आलेले सोयाबीन वाहून गेले आहे.

Share This Article
Exit mobile version