– काढणीच्या वेळीस सोयाबीनचे भाव पाडले, सरसकट १० हजाराचा भाव देण्याची मागणी
चिखली (तालुका प्रतिनिधी) – ऐन सोयाबीन काढणीच्या वेळीच व्यापार्यांनी सोयाबीनचे भाव पाडले आहेत. तेव्हा, सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून सोयाबीनला सरसकट १० हजार रुपयांचा भाव देण्यात यावा, अशी मागणी चिखली तहसीलदारांमार्फत रिपब्लिकन सेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
शेतकर्यांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार भाव मिळावा म्हणून रिपब्लीकन सेनेच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.२६/९/२०२२ रोजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्यानिशी निवेदन दिले. निवेदनात नमूद आहे, की कोरोना महामारीमध्ये शेतकरी हवालदिल होऊन पिंजला गेला आहे. शेतकर्यांवर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट चालू असतात. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकर्याला सोयाबीन या पिकांना हमीभाव सरसकट किमान दहा हजार देण्यात यावा. शेतकरी शेतात कष्ट करून सगळ्याचे पोट भरत होता, आज सगळ्यांचे व्यवसाय सुरळीत चालू आहे, पेट्रोल, गॅस, खाद्य पदार्थ सगळ्यांचेच भाव गगनाला भिडले आहे, शेतकर्याने सोयाबीन पेरली की भाव वाढतात व ऐन शेतकर्याची सोयाबीन काढणीला आली की भाव गडगडतात, असे कट कारस्थान करून व्यापारी व सरकार शेतकर्यांना देशोधडीला लावत आहे, सोयाबीन पेरणी वेळेस ८००० प्रती क्विंटल भाव होता. परंतु, आज सोयाबीन काढणीच्या वेळी ४००० ते ५००० हजार भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांच्या सोयाबीनला किमान दहा हजार प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, या मागणीवर तत्काळ निर्णय घेऊन भाव जाहीर करावा, अन्यथा या रिपब्लीकन सेनेच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, शहराध्यक्ष सुनील सोळंके, शहर उपाध्यक्ष रमेश आंभोरे, युवा शहर अध्यक्ष शेख मलिक, उपाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष वसीम भाई, ऋषिकेश हिवाळे, अप्पू खान, शेख दानिश, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, विकी निकाळजे, यश बावस्कर, राम बावस्कर, प्रदीपभाऊ हिवाळे, विलास गवई, तोरणवाडा, विश्वनाथ सपकाळ वाघापूर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

