अबब! दगड घालून बनवलेली नाली रातोरात गायब!

editor 1 Min Read
1 Min Read

निलंगा (तालुका प्रतिनिधी) – एखादे काम करत असताना किती शिल्लक राहील, किमान कोठे तरी लिमिट ठेवायला तरी हवे. निलंगा शहरात नाली बांधकामात चक्क दगडाचा वापर होत असल्याची बाब समोर आल्याने जनतेमधून होत असलेली चर्चा पाहून चक्क संबंधित गुत्तेदाराने रातोरात संपूर्ण नालीच गायब केल्याची चर्चा सध्या निलंगा शहरात जोरात रंगत आहे. कोणी लक्ष देत नाही म्हणून चक्क नालीत दगड भरावेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील काही दिवसांपासून निलंगा शहरात ठराविक गुत्तेदारांची चलती सुरू झाली आहे. अनेक कामे निकृष्टदर्जाचे करुनही कोणाला दिसली नाही म्हणून हे गुत्तेदार निर्ढावलेले आहेत. दापकावेस परिसरातील नाली बांधकामात चक्क दगडाचा वापर करण्यात येत असल्याचे माजी सभापती ईश्वर पाटील यांच्या नजरेत पडले, आणि मांजर दूध चोरुन पित असताना सापडली. मग काय शिवसेना स्टाईल काम बंद पाडले. ईश्वर दादांनी संबंधित विभागातील कर्मचारी यांना आपला हिसका दाखवित ताबडतोब कारवाईची मागणी केली. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांना उघडे पाडण्याची आलेली नामी संधी दादा सोडत्याल तर कशी? म्हणूनच की काय त्यांनी संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा विडा उचलला आहे. या बाबीच्या अनेकांना गुदगुल्या होत आहेत हे मात्र खरे.

Share This Article
Exit mobile version