– शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान कार्ड व फोटो ओळखपत्रे देणार
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षात २७ अंगीकृत रुग्णालये कार्यरत आहेत व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेणार्यांची संख्या वाढावी, यासाठी आयुष्यमान भारत पंधरवडा साजरा केला जात आहे, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वेगवेगळ्या ९९६ आजारांकरीता ज्या रुग्णांकडे रेशन कार्ड आहे, अशा सर्वांना ९२ रुग्णालयातून योजनेचा लाभ घेता येतो. एकूण ७८ हजार रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये उपचार तसेच शस्त्रक्रिया आणि आरोग्यविषयक विविध बाबीचा समावेश आहे. या योजनेमुळे गरजवंताना दुर्धर आजाराचे ऑपरेशन करणे अथवा इतर उपचार करणे सहज सोपे होणार आहे. त्यासाठी ई-कार्ड महत्त्वाचे आहे, लाभार्थांनी सीएससी सेंटरवरून ई कार्ड काढून घ्यावे.
– डॉ.विवेक सावके, जिल्हा समन्वयक
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा २४ सप्टेंबररोजी जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, बाह्य वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन परवीन, जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके, जिल्हाप्रमुख चेतन जाधव, जिल्हा पर्यवेक्षक सुरज पवार, आरोग्यमित्र पियुष सावळे, योगेश्वर झगरे, मधुसूदन पवार, पवन बनसोडे, प्रणाली सपकाळ आदींच्या उपस्थितीमध्ये दोन आरोग्यमित्रांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये आरोग्यमित्र दीपाली अवसरमोल आणि आरोग्यमित्र किशोर ढवळे यांचा समावेश होता. जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके यांनी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यामध्ये होत असलेल्या आरोग्य शिबिरांबाबत आढावा आणि शाळेमध्ये होत असलेल्या जनजागृतीबद्दल माहिती दिली.

