सवणा ग्रामपंचायतीच्या गाळ्यांत ठाण मांडलेल्यांवर अखेर कारवाई

editor 2 Min Read
2 Min Read

– मनसेच्या आंदोलनानंतर ग्रामपंचायतीने ठोकले टाळे!

अंत्री कोळी, ता. चिखली (महेंद्र हिवाळे) – सवणा ग्रामपंचायतीच्या मालकीचे क्रांतीसूर्य महात्मा फुले शॉपींग कॉम्प्लेक्समधील गाळे तब्बल १० ते १५ वर्षांपासून ठरावीक लोकांच्याच ताब्यात असून, मी माणसे गाळ्याचे भाडेसुद्धा ग्रामपंचायतीकडे भरत नव्हते. अनेक बहाद्दरांनी तर पोटभाडेकरू ठेवून पैसा कमविण्याचा धंदा सुरु केला होता. ग्रामपंचायतीच्या गाळ्यांत ठाण मांडून बसलेल्यांना हाकला, तसेच या गाळ्यांचा पुनर्लिलाव करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात सवणा शाखेच्यावतीने करण्यात आली होती. तसेच, आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची दखल घेत, ग्रामपंचायतीने वर्षेनुवर्षे ठाण मांडलेल्यांचे गाळे खाली करत, या गाळ्यांना टाळे ठोकले आहेत. या कारवाईने गाळेधारकांत एकच खळबळ उडाली असून, ग्रामस्थांनी मात्र मनसे नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सवणा येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे वर्षानुवर्षे त्याच व्यक्तीच्या ताब्यात असून, गेल्या काही वर्षांपासून तेच लोक या गाळ्यांचा वापर करीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने हे गाळे भाडेतत्त्वावर दिले होते. संबंधित गाळे हे त्या धारकांच्या १०-१५ वर्षांपासून ताब्यात आहे, त्यांनी गळ्याचे भाडेसुद्धा भरलेले नसून, भाडेसुध्दा थकीत आहे. ज्यांना ग्रामपंचायतीने गाळे भाड्याने दिले आह, त्यांनी ते बेकायदेशीररित्या दुसर्‍यांना भाड्याने दिलेले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे मनसे सवणा शाखेच्यावतीने दिनांक ०६/०७/२०२२ रोजी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाने आज, दि.२३ सप्टेंबररोजी मनसे पदाधिकार्‍यांच्या समक्ष तात्काळ सर्व गाळे खाली करून त्यांना कुलूप ठोकले व लवकरच सर्व गाळ्यांचे पुनश्च लिलाव केला जाईल, असे सांगितले. सवणा मनसे शाखेचे हे दुसर्‍यांदा यश असून, त्यांची सर्वस्तरातून प्रशंसा केली जात आहे. याप्रसंगी श्रीनाथ पवार, परमेश्वर गाढवे, सचिन थिगळे, ज्ञानेश्वर हाडे, उमेश भुतेकर, संतोष पवार, गजानन भुतेकर, अनिल हाडे, विलास जाचक, बद्री बनसोडे यांसह अन्य कार्यकर्ते तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version