चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील मराठी प्राथमिक शाळेत आज (दि.२२) सकाळी ११ वाजता एक माकड अचानक येवून शाळेच्या आवारात असलेल्या इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सर्वज्ञ प्रवीण खेडेकर या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सर्वज्ञ हा बराच जखमी झाला आहे. तसेच, माकडाच्या हल्ल्याने तो प्रचंड घाबरलेला असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. अंत्री खेडेकर गावात माकडांचा हैदोस कायम असून, वनविभागाने अद्यापही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत वनविभागाचे कर्मचारी हबीब पठाण यांच्याशी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने संपर्क केला असता, उद्या सकाळी नऊ वाजता आमची टीम घेऊन शाळेमध्ये हजर होतो, असे त्यांनी फोनवरून सांगितले. यापूर्वीसुद्धा येथील माकडांचा शाळेला व गावकर्यांना खूपच त्रास होत होता. गावातील बरीच माकडे यापूर्वी वन्य प्राणीमित्र समाधान गिरी यांनी पकडून नेली होती. परंतु, गावांमध्ये दुसर्या गटातील सात म्हाळे आले आहेत, व तेच गावामध्ये हैदोस घालीत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ या वन्यप्राण्यांपासून त्रस्त आहेत. आज रोजी अंत्री खेडेकरमध्ये माकडांमुळे खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

