– उद्या, रविवारी शासकीय इतमामात नवापूर येथे अंत्यसंस्कार
नंदूरबार (आफताब खान) – तब्बल नऊ वेळा खासदारकी भूषवलेले तथा देशाचे माजी गृहराज्यमंत्री, तत्कालिन हंगामी लोकसभा अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे आज (दि.१७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नाशिकमधील सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. गावित यांचे पुत्र तसेच मुलगी राजकारणात सक्रिय आहेत. मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार तर पुत्र भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
आपल्या संसदीय कारकिर्दीत १९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते. १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले होते.
मोदी लाटेने वर्ड रेकॉर्ड हुकविला
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी माणिकराव गावित यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून ते निवडून आले, तर १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले. ते सर्वप्रथम १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून गेले आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला नसता तर त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला असता.
काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवली
लहानपणापासूनच राजकारणाची आवड असलेल्या माणिकराव गावित यांनी अखेरपर्यंत गांधी घराण्याच्या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत, काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच ते नंदूरबारसारख्या आदिवासी भागात काँग्रेसच्या उमेदवारीवर सलग नऊवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. खासदारकीची निवडणूक लढवण्यापूर्वी ते सलग तीनवेळा आमदार आणि त्याआधी ते सलग दोनवेळा नंदूरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे. त्यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव नाशिकहून नवापूर इथं आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता नंदूरबार जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या नवापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
——————-

