– देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबणार होते, आता बॅनरवर फडणवीसांचा फोटो कसा चालतो? : दानवे
– लोकप्रतिनिधी सोडून गेले म्हणून काय झाले, लोकं मात्र आपल्यासोबत आहेत, सर्व मतदारसंघात तयारी करा, शिवसैनिकांना निर्देश!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्यात दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून त्यांना ठणकावले. एवढेच नव्हे तर बुलढाणा नगरपालिका माझी, माझ्याच पोराची असे स्वप्नही कुणी पाहू नका, असा टोलाही त्यांनी गायकवाड यांना हाणला. इथले आमदार नगरपालिकेत बसून अनधिकृत कामे करतात, बुलढाण्यात वरली-मटका खुलेआम चालतो, एसपी ऑफिसच्या बाजूला अवैध धंदे चालतात, इथले पोलिस झोपले आहेत का? असा सवाल करत पोलिसांनो, सत्ताधारी पक्षाच्या ताटाखालचे मांजर बनू नका, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.
याप्रसंगी दानवे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर नामाेल्लेख टाळून घणाघाती टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात इथले आमदार कोरोनाचे जंतू कोंबणार होते. आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात? सत्ता काय येते आणि जाते, सत्तेची खूर्ची कायमची घेऊन कुणी आले नाही. बुलढाणा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी राहिले नाही म्हणून काय झाले, त्यांना निवडून देणारे लोकं मात्र आपल्यासोबत, शिवसेनेसोबत, ठाकरेंसोबत आहेत, असे नीक्षून सांगत, शिवसैनिकांनो, तुम्हाला ‘गिनके आणि चुनके’ मारणारा अजून जन्माला यायचा आहे, दादागिरीला आता दादागिरीनेच उत्तर द्या, असेही दानवे यांनी ठणकावले.
दरम्यान, शिवसेनेच्या मागील कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता तसला काही प्रकार झाला तर जिल्हा पेटून उठेल, म्हणून जिल्हा पोलिसांनी शहरात व कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी, दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी पोलिसांनी तपासणीशिवाय कुणालाही आत सोडले नाही.

