आश्रमशाळेतील विद्यार्थी घेणार आता स्मार्ट शिक्षण

editor 2 Min Read
2 Min Read

धुळे । जिल्हा प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, धुळे अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील मुले-मुलीही आता स्मार्ट शिक्षण घेणार आहेत. त्याची सुरुवात साक्री तालुक्यातील उमरपाटा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेपासून झाली आहे.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम धुळे प्रकल्पातील 10 आश्रमशाळांमध्ये राबविण्यात येत आहे. सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर (प्रशासन) यांच्या हस्ते आज सकाळी या प्रकल्पाचे उमरपाटा शासकीय आश्रमशाळेत उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त त्यांचे व पालकांचे प्रातिनिधिक स्वरूपात पुष्प देऊन स्वागत तर पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य छगन कृष्णा राऊत, साक्री पंचायत समितीच्या सदस्या रुथाताई सुनील बिलकुळे,जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. एल. सोनवणे आदी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लास रुम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. आश्रमशाळांबरोबरच आरोग्य सुविधा, दळणवळणाची साधने उपलब्ध करून दिली. कोरोना विषाणूमुळे शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. धुळे प्रकल्पातील 10 शाळांमध्ये डिजिटल क्लास रुम कार्यान्वित केले आहेत. यात साक्री तालुक्यातील 7, शिरपूर तालुक्यातील 2 तर शिंदखेडा तालुक्यातील एक आश्रमशाळेचा समावेश असल्याचेही जानकर यांनी सांगितले. राऊत यांनी सांगितले, राज्य शासनाने शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत मनःपूर्वक अभ्यास करावा. शालेय शिस्तीचे पालन करावे. रोजगार मिळविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. पालकांनाही शाळेतील सोयीसुविधा यांची माहिती दिली पाहिजे. पालकांनी सुद्धा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवले पाहिजे.
मुख्याध्यापक सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, निवासी विद्यार्थ्यांना महाडीबीटीच्या माध्यमातून निधी वर्ग करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत देण्यात येत असलेल्या सोईसुविधांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते देवा कुवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version