– जालन्यातील भाजपचा मोर्चा राज्यभर चर्चेत
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जालना येथे भारतीय जनता पक्षाने काढलेला जलआक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी महिला व पुरुषांना दोनशे ते अडिचशे रुपये देऊन भाड्याने आणल्याचे उघडकीस आणणारी एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या रेकॉर्डिंगने भाजपचा गर्दी जमविण्याचा फंडा चव्हाट्यावर आला असून, याबाबत राज्यभरात सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल झालेली रेकॉर्डिंग ब्रेकिंग महाराष्ट्राच्याही हाती लागली असून, ती येथे वाचकांच्या माहितीस्तव देत आहोत. दोन महिला यात मोबाईलवर संभाषण करत असून, एकमेकींना किती रुपये दिले-घेतले याबाबत चर्चा करत आहेत.
दरम्यान, जालनेकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दानवे हे केंद्रात मंत्री असतानाही त्यांना पाणीप्रश्न सोडविता आला नाही, याबद्दल मात्र सोशल मीडियावर या मोर्चावरून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यातच आता मोर्चासाठी भाडेतत्वावर आणलेल्या महिलेचे अन्य एका महिलेशी झालेले संभाषण व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चेला भर पडली.
जालना शहारातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. राज्यात व केंद्रात सरकार मात्र कुणाचेही असो, शहराच्या पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जालना भाजपाच्यावतीने राज्य सरकार विरोधात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार तथा जिल्हाध्यक्ष संतोष दानवे व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. यामोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, भास्कर दानवेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

