पाचोड (विजय चिडे) – मराठवाड्यातील जवळपास सर्वच शाळांनी विद्याथ्यांचे आज जोरदार स्वागत केले. तसेच, मुरमा ता. पैठण येथील जिल्हा परिषद शाळेनेदेखील शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. नवीन विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले असून, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठ्यपुस्तकेही वाटप करण्यात आली. राज्यातील शाळा दि. १५रोजी सुरु झाल्या, अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला.
गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला. शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणार्या चिमुकल्यांनी नव्याकोर्या गणवेशाची नवलाई अनुभवली. पुस्तकांचा तो खास गंध श्वास भरून मुलांनी घेतला. सुटीत थोडे दूर गेलेल्या दप्तर, डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली. कुणी मामांसोबत तर कुणी बाबांच्यातर कुणी आईचं बोट धरून शाळेत आलं. शाळेतही फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढून मुलांचे स्वागत केले. बालवाडीतील मुलांच्या चेहर्यावर भीती होती तर थोड्या मोठ्या किंवा विद्यार्थ्यांनी मात्र, खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींना कडकडून मिठी मारत शाळेचा पहिला दिवस एन्जॉय केला आहे.
बुधवारी शाळांचा परिसर अशा गजबजलेल्या वातावरणात हरवून गेला. यावेळी सरपंच सिधूबाई दादासाहेब शिंदे, उषाताई दिनकर मापारी, शाळेय समिती अध्यक्ष बाळासाहेब फटांगडे, उपाध्यक्ष गोरख मापारी, शाळेचे मुख्यध्यापक उध्दव दराडे, शिक्षक एकनाथ कोलते, शिवाजी वैद्य, संदीप बहीर, शिक्षिका आम्रपाली सोनवणे, शिवनंदा पोपळघट, वैशाली सोनवणेसह आदी गावकरी उपस्थित होते.
मुलांना गुलाबपुष्प देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा!

