Breaking news! भाईजी उपाख्य राधेश्याम चांडक यांच्या अपहरण व हत्येचा कट उधळला!

editor 3 Min Read
3 Min Read

– गुप्तचर संस्था ‘आयबी’कडून तीन तरुण जेरबंद; बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – झटपट श्रीमंत होण्यासाठी चक्क बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी व मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट व त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचणार्‍या तिघा जणांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा ‘आयबी’ने मोठ्या शिताफीने नवी दिल्लीत अटक करून भाईजींच्या अपहरणाचा कट उधळला आहे. या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर काल त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे तिघेही बुलढाणा शहरातील रहिवासी असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तथापि, आपली कुणाशीही दुश्मनी नाही, तरी या तरुणांनी असे पाऊल का उचलले, असे आश्चर्य भाईजी उपाख्य राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा या तिघांची सद्या कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा आवेज बेग, शेख साकीब शेख अन्वर, उबेद खान शेर खान, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते बुलडाणा शहरातील शेर -ए -अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गनसुद्धा विकत घेतली होती. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून कोट्यवधी रुपये कमवायचे, असा प्लॅन त्यांचा होता. त्यासाठी त्यांनी बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक व चैनसुख संचेती यांची निवड केली आहे. ते या दोघांच्या अपहरणाचा कट रचत असतानाच, त्याची कुणकुण केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला लागली. दिल्लीत आयबी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले, त्यांची कसून चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी माहिती बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. आयबीने ९ सप्टेंबररोजी या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर काल १३ सप्टेंबरला बुलडाणा पोलिसांना या तिघांचा ताबा दिला. चौकशीदरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा त्यांचा प्लॅन होता, असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, या घटनेने शहर व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


दरम्यान, याबाबत भाईजी उपाख्य राधेश्याम चांडक यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, नेमका काय प्रकार आहे, त्याची माहिती पोलिसांकडून घेतली आहे. परंतु, माझा कुणीही शत्रू नाही. पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळाली की प्रसारमाध्यमांशी चर्चा करता येईल.
—————

Share This Article
Exit mobile version