– मंदिरातील चोरीला हजार दिवस पूर्ण, आता शिंदे सरकारनेच लक्ष घालण्याची भाविकांची मागणी
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूरसह आंध्रप्रदेश, कर्नाटकांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्डी (उत्तर सोलापूर) येथील यमाई देवी मंदिरातील देवीचे सौभाग्य लेणे यासह ४० ते ५० किलो चांदी, आठ ते दहा तोळे सोने, दानपेटीतील अडिच ते तीन लाखाची रोख रक्कम चोरीस जावून आता हजार दिवस पूर्ण होत आलेत, तरीही पोलिसांना चोरांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे देवीचे सौभाग्य लेणे कधी परत येणार व आरोपींना अटक केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत असून, देवीभक्तांनी एका दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने तातडीने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी देवीभक्त करत आहेत.
चोरी करून जाताना चोरट्यांनी देवीच्या चेहर्यावर वस्त्राने झाकले होते. यापूर्वी नवरात्र काळातदेखील मंदिरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर व त्याच खोलीतील बंद कपाटातील एक ते दीड लाख रुपयांची नाणी चोरीला गेली होती. वारंवार दानपेटी फोडून त्यातील रक्कम व मौल्यवान वस्तू गायब होत असतात. त्यामुळे चोरटे हे मंदिराशी संबंधित असावेत, असा संशय निर्माण होतो आहे. याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारही झालेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाच चोरी कशी काय होते, हादेखील मोठा प्रश्न आहे.
——————-
