मुरादपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराचे ‘पोस्टमॉर्टेम’ करा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– निधी खर्चात अनियमिततेचा आरोप; हायमास्ट अंधारात, घंटागाडी धूळ खात
– माजी उपसरपंच विष्णू गाडेकर यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील मुरादपूर ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप करत गावाचे माजी उपसरपंच विष्णू भगवान गाडेकर यांनी सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून, त्याची प्रतिलिपी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, मुरादपूर ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून प्रत्यक्ष काम न करता निधी काढण्यात आल्याचा आरोप गाडेकर यांनी केला आहे. ग्रामपंचायतीत काही कामे नियमबाह्य झाल्याची तक्रार यापूर्वीही वेळोवेळी करण्यात आली; मात्र आजपर्यंत या कामांची चौकशी झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. १५ व्या वित्त आयोगातील कामांसह घरपट्टी व पाणीपट्टीतून झालेल्या वसुलीचीही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय वेळोवेळी एकाच मजुराच्या नावाने पैसे काढण्यात आले, अतिक्रमणधारकांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, तसेच काही बोगस ठराव घेण्यात आले, असेही गंभीर आरोप अर्जात आहेत.

गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याकडेही तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे. गावातील हायमास्ट दिवे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असून, स्वच्छता मिशन केवळ ‘फोटोपुरते’ मर्यादित राहिल्याची टीका गाडेकर यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मिळालेली घंटागाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही आणि ती धूळखात पडून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कामांची माहिती वेळोवेळी मागूनही ती दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला असून, ग्रामपंचायतीतील सर्व कामांसह सीसीटीव्ही, नाली काम आणि ग्रामपंचायतीचे साहित्य यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आता या तक्रारीवर प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे मुरादपूरच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version