काटेपांग्री येथील पाणीपुरवठ्याची विहीर तुडुंब; गावात मात्र पाण्याचा तुटवडा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-विहिरीत २४ तास पाणी आणि मोटारपंप सुरू, तरी आठ-आठ दिवस पाणीपुरवठा नाही; ग्रामस्थांचा आरोप

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथून जवळच असलेल्या काटेपांग्री येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा असतानाही गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

काटेपांग्री गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वीही केली होती. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी म्हस्के यांना माहिती देण्यात आली होती. त्यावेळी, पाणीपुरवठा व्यवस्थित होतो की नाही, याची मला माहिती नाही; परंतु याकडे लक्ष घालतो, असे आश्वासन म्हस्के यांनी दिले होते. मात्र, काटेपांग्री तलावाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीच्या चोहोबाजूंनी पाणी वाहत असून, त्या पाण्याचा एक दांडा विहिरीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे ही विहीर २४ तास पाण्याने तुडुंब भरलेली असते. मोटारपंपही सुरू असतो. असे असतानाही गावात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. नेमके हे पाणी कुठे मुरते, याचा शोध ग्रामपंचायत अधिकारी म्हस्के आणि प्रशासकीय सरपंच यांनी घेऊन गावात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गजानन काटे आणि दिलीप थिगळे यांनी केली आहे.

यावर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, या पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. हा अपव्यय थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत असल्याने अनेक शेतकरी त्याचा उपयोग सिंचनासाठी करीत आहेत. उर्वरित पाणी सावंगी माळी तलावात जात आहे. सध्या सावंगी माळी तलावात अनेक मोटारपंप सुरू असून, तलावात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरूच राहिल्यास जानेवारी महिन्यात तलाव कोरडा पडण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे, अशी मागणीही गजानन काटे यांनी केली आहे.

 

Share This Article
Exit mobile version