-महसूल विभागाचे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश; नागरिकांना मिळणार दिलासा
चिखली (राजेंद्र घुबे) : ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक संबंध येणाऱ्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या दर्शनी भागात महसूल सेवांचे अधिकृत शुल्क आणि दरपत्रक लावण्याबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील नागरिक पंकज तुळशीराम होन यांनी ८ जुलै २०२६ रोजी ई-मेलद्वारे महसूल विभागाकडे यासंदर्भात निवेदन सादर केले होते. तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये विविध दाखले, सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसूल सेवांसाठी नेमके किती शासकीय शुल्क आकारले जाते, याची माहिती सामान्य नागरिकांना नसते. या अनभिज्ञतेचा फायदा घेत अनेक ठिकाणी अनधिकृत शुल्क आकारणी किंवा एजंटांमार्फत नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात अधिकृत शुल्क व दरपत्रक स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावण्याची मागणी होन यांनी केली होती. त्यांच्या या निवेदनाची दखल घेत मंत्रालयातील महसूल विभागाचे कक्ष अधिकारी सोमानंद ढमढेरे यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या अर्जाच्या अनुषंगाने नियमानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल अर्जदारास कळवावा, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
काय होणार फायदा?
आर्थिक लूट थांबणार : प्रत्येक शासकीय सेवेचे अधिकृत शुल्क दर्शनी भागात नमूद केलेले असल्यास नागरिकांना नेमकी रक्कम समजेल. त्यामुळे अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्यांना आळा बसण्यास मदत होईल.
एजंटगिरीला चाप : अधिकृत माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना स्वतःची कामे थेट कार्यालयातून करून घेता येतील. परिणामी मध्यस्थ आणि एजंटांचा वावर कमी होण्यास मदत होईल.
कारभारात पारदर्शकता : महसूल विभागाच्या तळागाळातील कार्यालयांमध्ये सुशासन आणि पारदर्शकता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

