सवना येथे दिवसरात्र कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न!

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-बुलढाणा संघाने पटकावले प्रथम पारितोषिक; स्पर्धेत २२ संघांचा सहभाग

चिखली (महेंद्र हिवळे) : श्री चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळ, सवना येथे श्री शरद नाना मित्र मंडळ व हितचिंतकांच्या वतीने कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते. मंडळ तसेच खेळाडूंच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. मैदानावर दिवसरात्र कबड्डीचे सामने प्रचंड उत्साहात पार पडले. या स्पर्धेत एकूण २२ संघ सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे सवना गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन श्री शरद नाना हाडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पठाण सर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून मंडळाचे सचिव श्री. करवंदे यांनी मंडळाचा इतिहास गावकऱ्यांसमोर मांडला. शरद नाना हाडे यांनी गावातील होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपस्थितांना दिला. तर पठाण सर यांनी कबड्डी खेळाचे महत्त्व विशद केले. कबड्डी हा आपला मातीतला खेळ असून, त्यातून शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. पद्माकरजी भुतेकर, सर्व सदस्य, सवना केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. मुकीम पटेल सर, आयडॉल विजेता टीचर साखरे सर, नागरिक, कबड्डी खेळावर प्रेम करणारे गावातील युवक तसेच सहभागी सर्व संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शेख अनिस शेख कादर यांनी केले.

विविध मान्यवरांकडून पारितोषिके

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद सदस्य शरद नाना हाडे यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक संदीप भुतेकर यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक दीपक दिघेकर यांच्या वतीने, चतुर्थ पारितोषिक अनुरत होतेकर यांच्या वतीने, तर पाचवे पारितोषिक प्रकाश खरात यांच्या वतीने देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष पद्माकर भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यामध्ये प्रथम पारितोषिक बुलढाणा संघाने, द्वितीय पारितोषिक मारुती पेठ संघाने, तृतीय पारितोषिक टेंभुर्णी संघाने, चतुर्थ पारितोषिक सवना संघाने, तर पाचवे पारितोषिक खोलखेड संघाने पटकावले. विजेत्या संघांचे उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. यावेळी मंडळाचे सचिव कैलास करवंदे, उपाध्यक्ष सुभाष हाडे, विश्वास भुतेकर, सुनील पवार, अरुण खडके, विजय झोल, विजय भुतेकर, शिवा भुसारी, राजेंद्र भुतेकर, गणेश भुतेकर व असंख्य प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी श्री चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळाच्या संचालक मंडळाने आणि खेळाडूंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष वीर यांनी केले.

Share This Article
Exit mobile version