बुलडाणा ( जिल्हा प्रतिनिधी): कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन बोलेरो पिकअप पेटवून देत जाळली. ही खळबळजनक घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा शिवारात १५ जून रोजी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
मेहकर तालुक्यातील मांडवा व पारखेडच्या जंगलातून 15 जून रोजी पहाटे दोन बोलेरो पीकअप मध्ये २५ ते ३० गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना आला. या कार्यकर्त्यांनी देऊळगाव साकर्शा जवळ दोन्ही गाड्या अडवून गाड्यांमधील गायींची सुटका केली. या वाहनात कोंबून गायी भरल्यामुळे दोन गायींचा मृत्यू झालेला होता. गायींचा मृत्यू झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी दोन्ही वाहने पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी बोलेरो वाहनचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

