फार्मर आयडी नाही, तर शासकीय लाभही नाही!

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी फार्मर आयडी आवश्यक; तालुक्यातील ११ महसूल मंडळांत विशेष मोहीम, लाभ घेण्याचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : शासनाच्या विविध योजना तसेच अनुदानांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेली नसल्याने त्यांना शासनाच्या विविध अनुदानांपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी दि. २३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान तालुक्यातील विविध महसूल मंडळांत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, दि. २६ व २७ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ११ महसूल मंडळांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी काढून घ्यावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार विवेक नालट व तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे.

शासनाच्या विविध योजना तसेच अनुदानांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे आवश्यक आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेही आहे. मात्र, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडीची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. केवळ फार्मर आयडी काढलेली नसल्याच्या कारणामुळे अनेक मयत खातेदारांच्या वारसांच्या नावांची अधिकार अभिलेखात नोंददेखील झालेली नाही. एकही पात्र शेतकरी शासकीय योजना, अनुदान अथवा दुष्काळी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. फार्मर आयडी प्रलंबित असलेल्या सर्व खातेदार शेतकरी, वनपट्टेधारक शेतकरी तसेच पीएम किसान योजनेतील सक्रिय लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी तालुक्यात दि. २३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दि. २६ व २७ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ११ महसूल मंडळांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ नोव्हेंबर रोजी सहा महसूल मंडळांत शिबिरे

दि. २६ नोव्हेंबर रोजी मेहकर, डोणगाव, लोणी गवळी, वरवंड, देऊळगाव माळी व विवेकानंद नगर या महसूल मंडळांत शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यासाठी नोडल अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मेटांगळे, नरोटे, गायकवाड, कापसे, मोगल व आव्हाळे काम पाहणार आहेत. तसेच उपकृषी अधिकारी अंभोरे, धांडे व मेहेत्रे हेही उपस्थित राहणार आहेत.

२७ नोव्हेंबर रोजी पाच महसूल मंडळांत शिबिरे

दि. २७ नोव्हेंबर रोजी अंजनी, शेलगाव देशमुख, जानेफळ, नायगाव दत्तापूर व कल्याणा या महसूल मंडळांत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नोडल अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी महाजन, सोळंके व ढोके काम पाहणार आहेत. तर उपकृषी अधिकारी राजूरकर, खंदारे, तुपकर, मेहेत्रे व बोडखे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरांमध्ये फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करणे, ‘जिवंत सातबारा’ अंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नावांची अधिकार अभिलेखात (सातबारा) नोंद घेणे तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत फार्मर आयडी नसलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यावेळी संबंधित मंडळांतील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिबिरांमध्ये सेतू चालक विश्वास वाघ, फैयाज शहा, प्रदीप अल्हाट, अमोल ठाकरे, प्रशांत कष्टे, संतोष गवळी, श्रीकृष्ण मोडकर, सुनील काळे, विनोद भुसारी, गजानन डोळस, आशिष धतरकर व गजानन चाळगे सेवा देणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा व शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार विवेक नालट व तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version