राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. बबीताताई काळे यांनी पारधी मुलांसोबत साजरी केली दिवाळी-भाऊबीज!
हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के पाटील) : “दिव्यांच्या प्रकाशापेक्षा माणुसकीचा उजेड मोठा आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच सणाचा खरा सोहळा,” या भावनेतून राजर्षी शाहू महाविद्यालय, धाडच्या प्राचार्य तथा जिजाऊ अर्बनच्या सचिव सौ. बबीताताई नंदाराम काळे यांनी आपल्या कृतीतून एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. दिवाळीचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी मेहकर तालुक्यातील वरदडा येथील समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसोबत दिवाळी व भाऊबीज साजरी करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१६0 पारधी लेकरांची ‘हक्काची बहीण’
वरदडा येथील समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेतील १६० पारधी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
या सेवाकार्यात प्राचार्य सौ. बबीताताई काळे यांचे योगदान अत्यंत विशेष आहे. त्या केवळ सणासुदीपुरती मदत न करता, वेळोवेळी विविध प्रकारचे सहकार्य करून या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. आर्थिक मदत असो, जीवनावश्यक वस्तू असोत किंवा लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा विषय असो, त्या नेहमीच मायेच्या भावनेने पुढाकार घेतात. त्यांचे हे सातत्यपूर्ण योगदान पारधी आश्रम शाळेसाठी मायेचा आणि विश्वासाचा मोठा आधार ठरले आहे.
या प्रेरणादायी प्रसंगी डॉ. कु. अंजली नंदाराम काळे, डॉ. मनीष नंदाराम काळे, जिजाऊ अर्बन हिवरा आश्रम शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन बुरकुल, शिवदास इंगळे, मेहकर शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण सवडतकर, पारधी आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष युवराज पवार, सचिव सौ. रत्ना पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ. बबीताताई काळे यांच्या या संवेदनशील आणि लोकोपयोगी उपक्रमाने यंदाची दिवाळी पारधी मुलांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरली आहे.

