शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कांसाठी जागे व्हावे; रविकांत तुपकर यांचे आवाहन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा! किनगाव जट्टू येथील दुष्काळ एल्गार सभेतून सरकारला इशारा; ४ डिसेंबरच्या बुलढाणा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बिबी (ऋषी दंदाले) : सरसकट हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत, संपूर्ण कर्जमाफी, मागील वर्षातील प्रलंबित आणि चालू वर्षातील १०० टक्के पीकविमा मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नियोजनातून लोणार तालुका दौऱ्यावर आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी आंदोलनाची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जागे होऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी केलेला खर्चही वसूल करता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी रविकांत तुपकर यांनी दुष्काळ एल्गार यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेच्या पूर्वसंध्येला ६ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी लोणार तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी खळेगाव, महारचिकना, खापरखेड घुले, सोमठाणा, हिवराखंड, वीरपांग्रा आणि खंडाळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता किनगाव जट्टू येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दुष्काळ एल्गार सभा पार पडली. या सभेत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन असलेल्या सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा सरकारला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या भव्य मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवरील विविध समस्या रविकांत तुपकर यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द तुपकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

Share This Article
Exit mobile version