-दुकाने, हॉटेल आणि पानटपऱ्यांचा आधार घेत मटका व्यवसाय सुरू असल्याचा आरोप; कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : मेरा खुर्द येथे वरली मटका खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत असून, परिसरात वरली मटक्यासह जुगाराचा खुलेआम खेळ सुरू असल्याने सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या मेरा खुर्द परिसरात डबल चिट्टी, ऑनलाइन, पी भाव, पानावर भाव आणि मोबाईल अशा विविध पद्धतींनी मटका सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी मटका चालविण्याचे काम थेट मालकांकडून, तर काही ठिकाणी एजंटांमार्फत केले जाते. काही ठिकाणी फिरत्या स्वरूपातही मटका घेतला जात असल्याची माहिती आहे. मटका कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचे कलेक्शन कुठे जमा करायचे, ते मालकापर्यंत कसे पोहोचवायचे आणि ग्राहकांचे पेमेंट कसे भागवायचे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकारांकडे संबंधित यंत्रणांचे पुरेसे लक्ष नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कारवाई झालीच, तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि काही दिवसांत पुन्हा मटक्याचे अड्डे सुरू होतात, अशी चर्चा परिसरात आहे. अनेक अधिकारी आले आणि गेले, तरी मेरा खुर्द येथील मटका व्यवसाय सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन अधिकारी आल्यानंतर कारवाईचा देखावा केला जातो; मात्र चार दिवसांनंतर पुन्हा हे अड्डे सुरू होतात, असा आरोपही केला जात आहे.
मटका कुठे आणि कसा सुरू आहे, तसेच त्यामागे कोण आहेत, याची माहिती परिसरातील अनेकांना असल्याचे बोलले जाते. मात्र, काही नागरिक भीतीपोटी तर काही जण जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात. या अवैध व्यवसायात गुरफटल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक आणि सामाजिक अडचणीत सापडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या प्रकारांमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना, लहान मुलांना आणि दुकानदारांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी पैशांची देवाणघेवाण सुरू असताना वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर भांडणात होते. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. दुकाने, हॉटेल आणि पानटपऱ्यांचा आधार घेत हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप असून, बाबुलाँज परिसरातही खुलेआम आकडे घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण : अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. अवैध जुगारावर आमची करडी नजर असून, संबंधितांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

