दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा

-चारा, पाणी, वीज आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करा; उपलब्ध शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी योग्य नियोजन करण्याचेही निर्देश

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी आर्थिक मदत, सवलती आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावा. तसेच पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि उपलब्ध शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ५ आक्टोबर रोजी ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार सिद्धार्थ खरात आणि आमदार मनोज कायंदे ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह जलसंधारण, कृषी, मृद व जलसंधारण आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक गडद होऊ नये, यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. महसूल आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ सुलभतेने मिळवून द्यावा. शासनाने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आर्थिक मदत वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही सर्व शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन

संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करावे. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वनक्षेत्रात वणवे लागू नयेत, यासाठी वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पाणी आरक्षणाबाबत शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून सिंचनासाठी पाण्याच्या उपलब्धतेची तपासणी करावी. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध आणि न्याय्य वितरण होईल, यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नद्यांचे खोलीकरण, तलावामधील गाळ काढणे, नाले खोलीकरण, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विजेचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने वीजपुरवठा सुरळीत राहील, याची खात्री करावी. संभाव्य पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलसंधारण आणि वीजपुरवठा या सर्व बाबींचे वेळेत नियोजन करून प्रशासनाने आगामी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

Share This Article
Exit mobile version