धार्मिक श्रद्धेला सामाजिक सेवेची जोड; लोणारमध्ये गोवंशासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वसुबारसचे औचित्य साधून ८० ते ९० गायी व वासरांची तपासणी; औषधोपचार, पशुखाद्य वाटप आणि पशुपालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

लोणार (वाजिद खान) : वसुबारस सणाचे औचित्य साधून लोणार येथील श्री वर्धमान गोरक्षण संस्थेत तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, लोणार, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि गोसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशुरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य प्रभाकरजी महाराज साहेब यांच्या जन्मभूमीत चातुर्मास २०२६ साठी विराजमान असलेल्या परमपूज्य किरणसुधाजी महाराज साहेब तसेच तपतेजस्विनी परमपूज्य विशालप्रभाजी महाराज साहेब आदी ठाणा ५ यांच्या पावन सान्निध्यात आणि प्रेरणेतून हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.

गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित या शिबिरात तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीने गोरक्षण संस्थेतील सुमारे ८० ते ९० लहान-मोठ्या गायी आणि वासरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व जनावरांना जंतनाशक आणि जीवनसत्त्वयुक्त औषधे देण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. गोवंशाच्या पोषणाची काळजी घेत जनावरांना सरकी ढेप आणि गुळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय पशुपालकांना वाळलेल्या चाऱ्याची प्रत सुधारण्यासाठी करावयाची प्रक्रिया, अझोला आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याबाबत तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. आर. डी. रायबोले, सुलतानपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे, हिरडवचे पशुधन पर्यवेक्षक जगदीश वानखेडे, रायगावचे पशुधन पर्यवेक्षक शुभम दोडके, लोणारचे परिचर उद्धव कायंदे, सुमित पवार, प्रतीक डोळस, आश्रू देशमुख तसेच जैन समाजातील जंबो सिंगी, अनिल संचेती, सतीश रुणवाल, आशिष गुगलिया यांच्यासह गोशाळेचे सर्व पदाधिकारी आणि जैन बांधव उपस्थित होते. निराधार, आजारी तसेच कत्तलखान्यातून वाचविलेल्या गोवंशाचा सांभाळ करणाऱ्या या संस्थेत वसुबारसच्या निमित्ताने केवळ पूजा न करता त्यांच्या आरोग्याची प्रत्यक्ष काळजी घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून जीवदया आणि करुणेचा संदेश देत धार्मिक श्रद्धेला सामाजिक सेवेची जोड देण्यात आली. या उपक्रमाचे नागरिक आणि गोप्रेमींकडून कौतुक होत आहे.

Share This Article
Exit mobile version