माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान

आळंदी (अर्जुन मेदनकर) : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेले, खेड तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, १९७५ मधील माजी नगरसेवक, शिक्षणमहर्षी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवराम बाबुराव घुंडरे पाटील यांचे दि. १ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

देवराम घुंडरे पाटील यांनी १९७७ साली कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी कस्तुरबा सेवा मंडळ वाचनालय व ग्रंथालय, कस्तुरबा बालक मंदिर आणि राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थांची उभारणी केली. ते या सर्व संस्थांचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच आळंदी नगरपालिका आणि ज्ञानेश्वर विद्यालय शिक्षक सोसायटीच्या जडणघडणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. वाचनालय आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. राष्ट्रीय सण, उत्सव तसेच राष्ट्रीय नेते आणि मान्यवरांच्या जयंती, पुण्यतिथी व इतर दिनविशेष साजरे करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आळंदी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश घुंडरे पाटील आणि आळंदी नगरपरिषदेचे कर्मचारी महेशनाना घुंडरे पाटील यांचे ते वडील होत.

Share This Article
Exit mobile version