इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम; दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत जाण्याचा महिलेचा निर्णय

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-पती, नातेवाईक आणि पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलेचा निर्णय कायम

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सुखी संसार सुरू असताना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर दोन मुलांची आई पतीपासून वेगळे होण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात घडली. पती, काका, चुलत भाऊ आणि इतर नातेवाईकांसह पोलिसांनीही महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर तिने संबंधित युवकासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका गावातून महिलेला ताब्यात घेतले होते. इन्स्टाग्रामवर तिचे प्रेमसंबंध जुळलेल्या ३० वर्षीय युवकासही साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी महिलेचा पती, काका, चुलत भाऊ आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. सर्वांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ तिची समजूत काढली. मात्र, “माझे खरे प्रेम याच्यासोबत आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला पतीसोबत राहायचे नाही,” अशी भूमिका महिलेने घेतली. संबंधित महिलेचा विवाह होऊन १२ वर्षे झाली असून, तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा दहा वर्षांचा, तर दुसरा मुलगा चार ते पाच वर्षांचा आहे. या काळात तिचे लांबच्या नात्यातील एका ३० वर्षीय युवकासोबत इन्स्टाग्रामवरून प्रेमसंबंध जुळले. कालांतराने हे संबंध अधिक दृढ झाल्यानंतर दोघांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दोघे एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी महिलेने चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन युवकासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची ठाम भूमिका पोलिसांसमोर मांडली. हे प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने साखरखेर्डा पोलिसांनी महिलेला मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले. मेहकरला जातानाही संबंधित युवकासोबत त्याच्याच वाहनातून जाण्याचा हट्ट तिने धरला. अखेर दोघेही मेहकरकडे रवाना झाले.

यावेळी काका, चुलत भाऊ आणि गावातील इतर नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. बारा वर्षांचा संसार आणि दोन मुलांचे भविष्य यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी भावना नातेवाईकांकडून व्यक्त होत होती. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. सोशल मीडियावरील ओळखी आणि संबंधांमुळे कौटुंबिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अशा बाबींकडे कुटुंबीयांनीही संवेदनशीलतेने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेम आंधळे असते, असे म्हटले जाते; त्याचा प्रत्यय या घटनेतून आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Share This Article
Exit mobile version