-कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात डॉक्टरेट; दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर, एका संशोधन लेखाचे प्रकाशन आणि पेटंटची नोंद
पुणे (अर्जुन मेदनकर) : खालुंब्रे गावचे सुपुत्र प्रा. अतुल पवार यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल खालुंब्रे गावासह संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. अतुल पवार हे खालुंब्रे गावचे माजी सरपंच तथा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मा. गुलाबराव पवार यांचे सुपुत्र, तर खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. अमोलदादा पवार यांचे लहान बंधू आहेत. प्रा. अतुल पवार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, खालुंब्रे येथे, तर माध्यमिक शिक्षण संत तुकाराम विद्यालय, देहू येथे झाले. त्यानंतर त्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक, तळेगाव दाभाडे येथे डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. पुढे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), कोथरूड येथून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात बी.टेक. आणि एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले.
पीएच.डी.च्या संशोधन प्रवासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या संशोधन कार्याचे दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण व प्रकाशन झाले असून, एका आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात त्यांचा संशोधन लेख प्रकाशित झाला आहे. याशिवाय त्यांच्या संशोधनातून एका पेटंटचीही नोंद झाली आहे. ही कामगिरी त्यांच्या संशोधनातील सातत्य, मेहनत आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारी आहे. प्रा. अतुल पवार हे गेल्या १६ वर्षांपासून निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) संगणक विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या संपूर्ण संशोधन प्रवासात त्यांना पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. नरेंद्र कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संगणक विभागप्रमुख डॉ. सोनाली डी. पाटील, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. के. राजेश्वरी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीईटी ट्रस्टचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
या यशामागे कुटुंबीयांचा मोठा वाटा असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच पीएच.डी.चे स्वप्न साकार करता आले, अशी भावना प्रा. अतुल पवार यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातून पुढे येत उच्च शिक्षण, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या प्रा. अतुल पवार यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, आळंदी शहर शिवसेना उपशहरप्रमुख माऊली घुंडरे पाटील, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर आणि उपाध्यक्ष बाळासाहेब पेठकर यांनी प्रा. अतुल पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

