-आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी साधला संवाद; तहसीलदारांना कारवाईचे सक्त आदेश
-महिलांच्या सन्मानाशी खेळाल, तर भारतीय जनता युवा मोर्चा गप्प बसणार नाही! – संतोष काळे पाटील
चिखली (अंकुश पाटील) : आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ येथील तब्बल ४०० ते ५०० महिलांनी चिखली तहसील कार्यालयात एकत्र येत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित मनमानी वसुलीविरोधात आवाज उठविला. यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी संवाद साधला, तर तहसीलदारांना संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले.
ग्रामीण कुटा फायनान्स, चैतन्य फायनान्स चिखली, स्मॉल फायनान्स चिखली, एचडीएफसी बचत गट फायनान्स, आय मायक्रो फायनान्स यांसह विविध फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी महिलांना वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या गंभीर तक्रारी महिलांनी यावेळी मांडल्या. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांकडून होणारा मानसिक त्रास आणि सक्तीची वसुली कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. यासंदर्भात चिखली तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. महिलांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी फायनान्स कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “आज आम्ही लोकशाही मार्गाने आणि सौम्य भाषेत निवेदन दिले आहे. मात्र, यापुढे फायनान्स कंपन्यांनी महिलांना फोन करून, त्यांच्या घरी जाऊन किंवा कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गाठ भारतीय जनता युवा मोर्चाशी आहे, हे लक्षात ठेवावे. महिलांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”
महिलांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील!
“महिलांचा सन्मान हीच आमची जबाबदारी आणि त्यांना न्याय मिळवून देणे हाच आमचा निर्धार. महिलांच्या हक्कासाठीचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील,” असे संतोष काळे पाटील यांनी स्पष्ट केले.