-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा लवकर सुरू करण्याच्या सूचना; जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा घेतला वर्ग, ग्रामपंचायतीलाही भेट
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पावरील सात गाव पाणीपुरवठा योजनेची गटविकास अधिकारी दिनकरराव खरात यांनी २८ ऑक्टोबर रोजी पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याबाबत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच ‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रमांतर्गत त्यांनी गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनील लोळगे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शाळेतील विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रमांतर्गत गटविकास अधिकारी दिनकर खरात आणि गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनील लोळगे यांनी देऊळगाव साखरशा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेच्या परिसराची आणि वर्गखोल्यांची पाहणी करून भौतिक सुविधा व विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. बीडीओ खरात यांनी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना रोमन अंकांसह विविध प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विस्तार अधिकारी शिंगणे, केंद्रप्रमुख विजय मोंढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास पाचपोर, मुख्याध्यापक बावणे, शिक्षक विजय होणे, देशमुख, केशेवार, गिरी यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीलाही भेट
गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी परिसरातील अंगणवाडी केंद्रालाही भेट दिली. तेथील व्यवस्थेची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका शारदा देशमुख आणि मदतनीस सौ. पाटील उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली आणि संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी अनंत आघाव, कर्मचारी भिकाजी गायकवाड, नितीन अल्हाट, मनोज देशमुख, ऑपरेटर कृष्णा बुंदे, उमेश जाधव आदी उपस्थित होते.

