वाघोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, पावती न देणे आणि वाद घालण्याचे आरोप; ग्रामस्थांचे तहसील कार्यालयात निवेदन

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील वाघोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्यांना नियमित व पूर्ण धान्यवाटप केले जात नसल्याचा आरोप करत संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात २३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. महसूल सहाय्यक गणेश नागरे यांनी हे निवेदन स्वीकारले.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गावातील पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे धान्य नियमितपणे वितरित केले जात नसल्याची तक्रार आहे. तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापेक्षा कमी धान्य दिले जात असल्याचा आणि धान्यवाटपाची पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धान्य घेण्यासाठी दुकानात जाणाऱ्या नागरिकांशी दुकानदाराकडून वाद घातला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळविताना अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित दुकानदाराच्या कारभाराची सखोल चौकशी करून धान्यवाटपाच्या नोंदी, ई-पॉस मशीनवरील व्यवहार आणि प्रत्यक्ष धान्यसाठ्याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित दुकानदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच वाघोरा येथील पात्र लाभार्थ्यांना अन्य दुकानदारामार्फत नियमित व पूर्ण धान्यवाटपाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर सरपंच पती हरिभाऊ गव्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मनोहर गव्हाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धू गव्हाड, तुकाराम गव्हाड, विक्रम सुतार, शिवाजी गव्हाड, संदीप जाधव, गजानन हनवते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव गव्हाड यांच्यासह दीपक खरात, बबन गव्हाड, उद्धव गव्हाड, नंद पाटील गव्हाड, मारुती गव्हाड, श्याम गव्हाड, भरत गव्हाड, अनिल मस्के, दत्ता गव्हाड, रमेश सुतार, प्रशांत सुतार, संतोष हनवते, कुंडलिक सुतार, प्रदीप काकडे, काशिनाथ कहाळे, गोपाल बिल्होरे, बाबासाहेब गव्हाड, अमोल डुकरे, हरिभाऊ उकंडे, अमोल काकडे, शरद हनवते, परमेश्वर डुकरे आणि चंद्रकांत गव्हाड यांच्यासह अन्य ग्रामस्थांची नावे आहेत. या निवेदनावर तहसील प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे वाघोरा येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version