-मतदान केंद्र क्रमांक ४७ व ४८ परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश; तहसीलदार विजय संवडे यांचे नागरिकांना आवाहन
अंकुश पाटील (चिखली) : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली तहसील कार्यालयात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ४७ व ४८ येथे आवश्यक प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षक मतदार, मतदान प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे तहसील कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनी उद्या कार्यालयात येणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार विजय संवडे यांनी केले आहे. नागरिकांनी या सूचनेची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि संभाव्य गैरसोय टाळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांनी नोंद घ्यावी : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने चिखली तहसील कार्यालयात जाण्यापूर्वी नागरिकांनी या सूचनेची दखल घ्यावी.
— विजय संवडे, तहसीलदार, चिखली

