-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामासमोर आव्हान; थकीत देणी देण्यास सुरुवात करण्याची ग्वाही, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : अत्यंत संघर्षातून उभा राहिलेला केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ही केवळ एक संस्था नसून, या परिसरातील शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि त्यांच्या पुढील पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेली संस्था आहे. कारखाना टिकविण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या शेतातील ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा. प्रतिकूल परिस्थितीतही कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी केले.
दुष्काळामुळे यंदाचा हंगाम आव्हानात्मक
कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी प्रास्ताविकात मागील दहा ते बारा वर्षांतील गळीत हंगामादरम्यान आलेल्या अडचणींचा आढावा घेतला. प्रत्येक वेळी सर्वांच्या सहकार्याने अडचणींवर मात करून हंगाम यशस्वी करण्यात आला; मात्र यंदाची परिस्थिती अधिक आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर भाष्य करताना प्रतापराव ढाकणे म्हणाले की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धरणे, तलाव आणि जलसाठे भरले होते. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षे पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. अनेक पिकांचे नुकसान झाले असून, ऊस उपलब्धतेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करणे हे मोठे आव्हान आहे.
‘शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यास सुरुवात करू’
कारखान्याच्या थकीत देयकांबाबत बोलताना ढाकणे यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मागील हंगामातील थकीत देणी देण्यास सुरुवात केली जाईल, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांनी कारखान्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. चालू हंगामातही शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील राहील आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकी विभागाने गळीत हंगामासाठी तयारी केली असून, ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या साधनांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
विस्तारीकरणाच्या स्पर्धेमुळे साखर उद्योग अडचणीत
महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या परिस्थितीवर भाष्य करताना ढाकणे म्हणाले की, अनेक कारखान्यांनी गाळप क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली; मात्र त्यानुसार ऊसक्षेत्र वाढले नाही. परिणामी, ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. ऊस पळवापळवी, दर जाहीर करण्याची स्पर्धा आणि वजनातील अनियमिततेबाबतचे प्रश्नही समोर येत आहेत. कारखान्यांची गाळप क्षमता ठरविताना परिसरातील ऊसक्षेत्र, पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध ऊस यांचा विचार करणे आवश्यक आहे. साखर उद्योगातील या स्पर्धेचा फटका शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊसतोडणी कामगारांच्या हक्कांचाही प्रश्न
ऊसतोडणी कामगारांच्या न्याय्य हक्कांचा उल्लेख करत ढाकणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत निराश न होता सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. कारखान्यांचा गळीत हंगाम कमी कालावधीत संपल्यास कामगारांच्या रोजगारावर आणि मजुरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि कारखाना व्यवस्थापन या सर्वांचे हित जपणारी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखाना राजकारणासाठी नव्हे, परिसराच्या विकासासाठी
केदारेश्वर कारखाना ही राजकारण करण्याची जागा नसून शेतकरी आणि परिसराच्या विकासासाठी उभी राहिलेली संस्था आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कारखाना टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले. शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहे. या भागाच्या विकासासाठी शासनाकडून विशेष निधी, सिंचन सुविधा आणि पाणी योजनांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. बोधेगाव स्वतंत्र तालुका व्हावा, ही मागणीही प्रलंबित असल्याचा उल्लेख त्यांनी केला. परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कारखाना सक्षमपणे सुरू राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या प्रश्नावरही भूमिका
जिल्हा सहकारी बँकेच्या संदर्भात बोलताना ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला. बँकेच्या कारभारात शेतकरी सभासदांचे हित अग्रस्थानी असावे आणि मोठ्या थकबाकीदारांबाबतही योग्य भूमिका घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा लढा व्यक्तीविरोधात नसून विचारांचा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाण पूजन
कार्यक्रमाच्या प्रारंभी माधव काटे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यकारी संचालक किरण शेलार यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आणि आगामी गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, संचालक प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, शाहदेव पातकळ, सिद्धाराम हिरमुके, अक्षय हिरमुके, अनिल मानुरकर, कल्लेश्वर कोटर्गे, हिराचंद माळी, संजू कलबुर्गी, स्वरूप खांबेकर, कमलेश संचेती, जितेंद्र छाजेड, हरविंदर सिंग प्रधान आणि कमलेश गोयल यांच्यासह ज्येष्ठ संचालक, आजी-माजी अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी, शेतकरी सभासद आणि ऊसतोडणी कामगार उपस्थित होते. डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.

