-शिंदी येथे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बुद्ध धम्म ग्रंथ पारायणाची सांगता; महिलांसह नागरिकांची उपस्थिती
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेले पंचशील हे सर्व धर्मांतील लोकांसाठी आचरणाचा मार्ग आहे. प्रत्येकाने पंचशीलाचे पालन करावे; अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा स्वीकार करून त्यातील कायद्यांचे पालन करावे, असे प्रतिपादन भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुखदाने यांनी केले.
शिंदी येथे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बुद्ध धम्म ग्रंथ पारायणाची २५ ऑक्टोबर रोजी सांगता झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराव बंगाळे होते. यावेळी भाई कैलास सुखदाने, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, गजेंद्र गवई, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, प्रतापराव मोरे, अंकुर देशपांडे आणि अशोक इंगळे उपस्थित होते. ग्रंथवाचन सुनील खंडारे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना भाई कैलास सुखदाने म्हणाले की, बुद्ध धम्म हा शांतीचा संदेश देणारा आहे. पंचशीलाच्या माध्यमातून चोरी न करणे, खोटे न बोलणे, महिलांची छेडछाड न करणे, मद्यप्राशन करून धिंगाणा न घालणे आणि एकमेकांचा सन्मान करणे, अशा मूल्यांची शिकवण दिली जाते. या तत्त्वांचे पालन न करणाऱ्यांना कायद्याला सामोरे जावे लागू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान सर्वांना समानपणे लागू होते. त्यामुळे प्रत्येकाने कायद्याचा आदर करणे आवश्यक आहे.
‘गौतम बुद्धांच्या विचारांच्या मार्गाने चला’, असे आवाहन अनेक नेते करतात. कारण भगवान गौतम बुद्धांचा धम्म केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारा आहे, असेही सुखदाने यांनी नमूद केले. यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. बुद्ध धम्म ग्रंथाचे श्रवण करण्यासाठी महिलांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. महिलांना ग्रंथातील विचारांचे ज्ञान मिळाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे घराघरांत ज्ञानाचा प्रसार होऊन अशा उपक्रमांचे खरे सार्थक होते, असे ते म्हणाले. शिंदी येथे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथश्रवण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बाबुराव मोरे आणि गजेंद्र गवई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन खंडारे यांनी केले. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

