-आत्माराम बापू खरात यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासात मोलाची साथ; २७ ऑक्टोबर रोजी रक्षा विसर्जन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व आत्माराम बापू खरात यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी कै. अनुसयाबाई आत्माराम खरात यांचे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिंदी येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.
साखरखेर्डा परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आत्माराम बापू खरात यांचे नाव आदराने घेतले जात असे. पांढरी टोपी, शुभ्र शर्ट आणि धोतर असा त्यांचा साधा पेहराव होता. शिंदी गावाचे सरपंच म्हणून त्यांनी १५ वर्षे काम करताना विविध विकासकामे केली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगूनही ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. १९७९ ते १९९१ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी या भागातील रस्ते आणि शाळांच्या विकासासाठी योगदान दिले. राजकीय जीवनात त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा कायम राखली. याच काळात ते मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही निवडून आले होते. आत्माराम बापू खरात यांच्या या सामाजिक आणि राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी अनुसयाबाई यांनी त्यांना मोलाची साथ दिली. गावातील वाद आणि तंटे गावातच मिटविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आत्माराम बापू खरात महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना साखरखेर्डा पोलीस ठाण्यात एकही तक्रार आली नसल्याचे सांगितले जाते. या कार्याबद्दल त्यांना सिंदखेडराजा तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर अनुसयाबाई आत्माराम खरात यांची महिला संचालक म्हणून निवड झाली होती. ग्रामसेवा सहकारी सोसायटीसह सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्येही या दाम्पत्याने वेगवेगळ्या पदांवर काम केले.
वयोमानानुसार २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आत्माराम बापू खरात यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अनुसयाबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा केली. आता अनुसयाबाईंच्या निधनाने खरात कुटुंबीयांसह शिंदी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरात घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे चालू राहावा, यासाठी त्यांनी पुत्र अशोक खरात यांना राजकीय कार्याचे धडे दिले. त्यांच्या सून सौ. साधना अशोक खरात या सध्या शिंदी गावाच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना तसेच दोन वेळा सरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात अशोक खरात यांनी रेशन दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना धान्य पुरविण्याचे काम केले होते. अनुसयाबाईंच्या निधनाने खरात कुटुंबीय, नातेवाईक आणि समस्त ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अंत्यसंस्काराच्या वेळी माजी आमदार तोताराम कायंदे, आमदार मनोज कायंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गिते, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

