पाण्याअभावी तुरी-कपाशी जळू देणार नाही!; ना. प्रतापराव जाधवांच्या मध्यस्थीने ‘कोराडी’, ‘पेनटाकळी’चे दरवाजे खरिपासाठी उघडणार!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– दुष्काळात बळीराजाला दिलासा!; कोराडी, पेनटाकळी प्रकल्पांतून खरीप पिकांसाठी पाणी सोडण्याचे आदेश!
– बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वगळून शिल्लक पाणी शेतीसाठी देणार; कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून पाणी वाया जाऊ देऊ नका – ना. प्रतापराव जाधव

हिवरा आश्रम (अरुणा म्हस्के पाटील) : पावसाचा पडलेला खंड आणि विहिरींच्या झपाट्याने घटणाऱ्या जलपातळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी कोराडी व पेनटाकळी प्रकल्पांसह परिसरातील इतर सिंचन प्रकल्पांमधून खरीप पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करावा. रब्बी पिकांसाठी या पाण्याचा मुळीच वापर करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला.

रविवारी (२५ ऑक्टोबर) मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किसनराव बळी, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळुकर यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे सामूहिक निवेदन

मेहकर व लोणार तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुरीसह हळद व कपाशीची पिके वाचवण्यासाठी सिंचन प्रकल्पांमधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी पेनटाकळी व कोराडी सिंचन क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सामूहिक निवेदनाद्वारे केली. सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न मिळाल्याने आता हाताशी आलेली इतर पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले.

‘ऑगस्ट २०२७ पर्यंत अल निनोचा प्रभाव’

परिस्थितीचे गांभीर्य विशद करताना केंद्रीय मंत्री जाधव म्हणाले, “यंदा भागात सुमारे ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत ‘अल निनो’चा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे.”

पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळून नियोजन

प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती देताना ना. जाधव यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पातील पाण्याचे ३० टक्के बाष्पीभवन होणार असून, १० टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवन आणि राखीव साठा वगळून उरलेले पाणी खरीप पिकांसाठी नदीपात्रात सोडण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. कोराडी व पेनटाकळीसह उकळी, पळशी, घाटबोरी, अकोला ठाकरे, परतापूर, उतावळी प्रकल्प आणि खळेगाव धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येईल.

Share This Article
Exit mobile version