-अज्ञात व्यक्तीविरुद्ध रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल; शेतकऱ्याचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान
चिखली (महेंद्र हिवाळे)) : रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंत्री कोळी शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या शेतात रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुडीला आग लावल्याची घटना घडली. या आगीत सुमारे २० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अंत्री कोळी येथील शेतकरी दिनेश बबनराव काळे यांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढून त्याची सुडी रचून ठेवली होती. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या सुडीला आग लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण सुडी जळून खाक झाली. या आगीत अंदाजे २० क्विंटल सोयाबीन जळाले असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्याने मेहनतीने पिकविलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने काळे यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेनंतर शेतकरी दिनेश काळे यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पोहेकॉ. दशरथ शितोळे करीत आहेत. शेतकऱ्याच्या कष्टाने पिकविलेल्या पिकाला आग लावल्याच्या या घटनेमुळे अंत्री कोळी परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

