– पाकिटांची देवाणघेवाण अन् पैठणीची खमंग चर्चा; निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
– ‘अमरावती-बुलढाणा’त विक्रमी मतदान; पण मूल्यांच्या राजकारणाला तडे गेल्याने समाजासमोर चिंतनाची वेळ!
अमरावती/बुलढाणा (बाळू वानखेडे) : समाजाचा आरसा आणि भावी पिढीचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते, त्या ‘गुरुजी’ वर्गाची भूमिका या निवडणुकीत पुन्हा एकदा चहुबाजूने चर्चेत आली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात तब्बल ९२ टक्क्यांहून अधिक (बुलढाण्यात ९३.६८ टक्के) विक्रमी मतदान झाले. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच, दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेल्या ‘पाकीट संस्कृती’ आणि ‘पैठणी राजकारणा’मुळे सुजाण नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
एका बाजूला ९२ टक्क्यांपेक्षा जास्त झालेले बंपर मतदान लोकशाहीची सुदृढ प्रकृती दर्शवत असले, तरी दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या रणांगणात रंगलेली उघड उघड उधळण चर्चेचा विषय ठरली आहे. सुजाण आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व मानल्या जाणाऱ्या शिक्षक वर्गापैकी काही जणांचे हात या निवडणुकीत ‘पाकिटां’नी मखल्याची चर्चा रंगली आहे. काहींना साड्या, पैठणी आणि आकर्षक बॅग्जची ‘भेट’ मिळाल्याची कुजबूज आहे, आणि विशेष म्हणजे गुरुजींनीही ती मोठ्या मनाने ‘सहज’ स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“विद्यार्थ्यांचा आदर्श असलेल्या शिक्षकांनीच जर बाबासाहेबांनी दिलेल्या अमूल्य मताचा असा ‘चिल्लर सौदा’ केला, तर उद्या ते भावी पिढीला काय शिकवणार आणि सामान्य मतदाराला कोणत्या तोंडाने दोष देणार?” – असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
गुरुजी, तुम्हीसुद्धा असा सौदा करणार का?
मानवी जीवनात शिक्षकाचे स्थान सर्वोच्च मानले जाते. विद्यार्थी आई-वडिलांच्या विरोधात जाईल, पण शिक्षकांच्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. देशाचे सुजाण, कर्तबदार आणि जबाबदार नागरिक घडवण्याची मोठी जबाबदारी या वर्गावर आहे. मात्र, जर राजकारणाच्या धूळफेकीत हेच शिल्पकार क्षुल्लक लाभासाठी किंवा ‘चिल्लर’ सौद्याला बळी पडत असतील, तर समाजाचा त्यांच्यावरील विश्वासाचा पायाच हादरल्यासारखा वाटतो.
जर ज्ञानाचे धडे देणारेच अशा प्रलोभनांना भुलू लागले, तर देशाचे भविष्य अंधारात जाण्यास वेळ लागणार नाही. आज प्रश्न केवळ एका निवडणुकीचा किंवा विजयाचा नाही, तर तो मूल्यांच्या राजकारणाचा आणि शिक्षक वॉर्डच्या नैतिक अधोगतीचा आहे.
आता गरज ‘चिंतन आणि मंथना’ची!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हा अधिकार अत्यंत मोलाचा आणि पवित्र मानून दिला आहे. या अधिकाराचा असा सौदा होत असेल, तर शिक्षक संघटनांनी केवळ निवडणुका लढवण्यापुरते मर्यादित न राहता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, भविष्यात या समाजाला योग्य दिशा कोण दाखवणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. मंगळवारी विजयाची गुलाल उधळला जाईल, नवीन आमदारही निवडला जाईल; परंतु या निवडणुकीने शिक्षकांच्या पवित्र प्रतिमेवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्यावर वेळीच चिंतन आणि मंथन करणे गरजेचे आहे.

