-किनगाव राजा येथील धक्कादायक घटना; २३ वर्षीय संजीवनीचा मृत्यू, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने दोरीने गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना किनगाव राजा येथे उघडकीस आली आहे. संजीवनी विजय दाभाडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती विजय संजय दाभाडे (वय ३१, रा. साखरखेड तेजन, सध्या रा. किनगाव राजा) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर किनगाव राजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संजीवनी हिचे वडील सुधाकर विठोबा वाघमारे (वय ५५, रा. हिवरखेड, ता. सिंदखेडराजा) यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, संजीवनीचा पती विजय याला दारू पिण्याची सवय होती. संजीवनी कोणाशीतरी फोनवर बोलते आणि तिचे बाहेर कोणाशीतरी संबंध आहेत, असा संशय तो तिच्यावर घेत होता. याच संशयातून २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी राहत्या घरात विजयने दोरीने गळा आवळून संजीवनीची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास पथक तयार केले. या पथकाने आरोपी विजय दाभाडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर करीत आहेत.
ही कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि देऊळगाव राजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ढोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष गिते, संदीप डोंगरे, गणेश वारकरी, मिलिंद सोनपसारे आणि असलम नौरंगाबादी यांनी सहभाग घेतला. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून घडलेल्या या कथित हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

