उद्या चिखली तहसील कार्यालयाकडे फिरकू नका! शिक्षक मतदानामुळे प्रशासनाचे कडक निर्बंध

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; तहसीलदार विजय संवडे यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

चिखली (अंकुश पाटील): शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवार (दि. २३ ऑक्टोबर २०२६) रोजी चिखली तहसील कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली असून, तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ४७ आणि ४८ परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार, केवळ संबंधित शिक्षक मतदार, अधिकृत मतदान प्रतिनिधी आणि उमेदवार यांनाच मतदान केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय इतर कोणत्याही नागरिकाला परिसरात प्रवेश करता येणार नाही.

मतदानादिवशी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी, दैनंदिन शासकीय कामकाजासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी उद्याच्या दिवशी कार्यालयात येणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार विजय संवडे यांनी केले आहे. प्रशासनाच्या या नियमाचे पालन करून नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

उद्या दि. २३ ऑक्टोबर रोजी चिखली तहसील कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तहसील परिसरात नागरिकांच्या प्रवेशास निर्बंध आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून उद्या तहसील कार्यालयात येणे टाळावे.” — विजय संवडे, तहसीलदार, चिखली

Share This Article
Exit mobile version