-शेकडो युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सामाजिक उपक्रम
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : नवरात्रोत्सवानिमित्त स्थानिक जगदंबा माता संस्थेतर्फे माळावरील देवी येथे २१ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन व्ही. के. जगताप आणि माजी सरपंच सुनील जगताप यांनी केले होते. गरजू रुग्णांसाठी हे शिबिर वरदान ठरावे, या उदात्त हेतूने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “आज देशाला रक्ताची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रत्येक युवकाने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी उपयोगी पडू शकतो. याच भावनेतून जगदंबा माता संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी प्रतिक्रिया माजी उपसभापती तथा माजी सरपंच सुनील जगताप यांनी दिली. दरम्यान, “हा सामाजिक उपक्रम प्रत्येक मंडळाने राबविला पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान श्री शिवाजी व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. इतर मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा,” असे आवाहन पुरवठा अधिकारी विवेक जगताप यांनी केले.

