-श्रीराम, श्री स्वामी महाराज आणि श्री भैरवनाथ महाराजांच्या पालख्यांचे उत्साहात स्वागत; खंडोबाचे माळरान भाविकांच्या गर्दीने फुलले
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील खंडोबाच्या माळरानावर विजयादशमीनिमित्त माऊलींच्या पालखीसह श्रीराम, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या पालख्यांचे हरिनामाच्या गजरात उत्साहात सीमोल्लंघन झाले. या सोहळ्यादरम्यान भाविक आणि नागरिकांनी पालख्यांतील श्रींच्या दर्शनासाठी तसेच श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा
खंडोबा मंदिराच्या माळरानावर श्रींच्या पालख्यांच्या दर्शनासाठी शहरातील नागरिक आणि भाविकांनी गर्दी केली होती. टाळ, मृदंग आणि वीणेच्या त्रिनादात दिंडीतील भाविक हरिनामाचा जयघोष करीत पालख्यांसह सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी झाले. श्री खंडोबा देवाच्या दर्शनासोबतच विविध पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी गजबजला होता. खंडोबा मंदिराच्या प्रांगणात सर्व पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, ज्येष्ठ नागरिक बबनराव कुऱ्हाडे पाटील, सतीश कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे आणि कुऱ्हाडे-पाटील ग्रामस्थांनी मान्यवर पदाधिकारी, संस्थानांचे विश्वस्त, व्यवस्थापक आणि सेवकांचे स्वागत केले.
माऊली मंदिरात धार्मिक कार्यक्रम
विजयादशमीनिमित्त माऊली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या महिम्न पूजा व अभिषेक, श्रींच्या संजीवन समाधीचे दर्शन आणि श्रींना महानैवेद्य अर्पण असे धार्मिक विधी पार पडले. माऊलींच्या बागेत शमीपूजन करण्यात आले, तर वीणा मंडपात प्रवचनसेवा झाली. शाही लवाजम्यासह श्रींच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात सीमोल्लंघनासाठी प्रस्थान झाले. आळंदी देवस्थानच्या वतीने श्रींची पालखी मंदिरात परतल्यानंतर धूपारती आणि नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा करण्यात आली. विजयादशमीनिमित्त आळंदीतील श्रीराम आणि श्री स्वामी महाराज यांच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा तसेच मंदिरात आगमनही उत्साहात झाले. विजयादशमी आणि नवरात्रीतील प्रथा-परंपरांचे पालन करीत आळंदीत धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात आला. सोन्याचे प्रतीक मानली जाणारी आपट्याची पाने नागरिकांनी एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या. मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच मंदिर परिसरात नवीन वाहनांच्या पूजनासाठीही भाविकांची गर्दी झाली. पालखी सोहळ्यादरम्यान भजन, अभंग आणि आरतीत भाविक तल्लीन झाले होते. पालखी मार्गाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. भाईचारा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुलतान शेख, राजेंद्र धोका परिवार आणि आळंदीकर ग्रामस्थांनी खंडोबा मंदिर परिसरात पालख्यांचे स्वागत केले. यावेळी क्रांती पार्क परिसरातील नागरिकही उपस्थित होते. विजयादशमीनिमित्त आळंदीतील विविध ठिकाणी नव्या उपक्रमांना सुरुवात झाली. व्यापारी आस्थापनांमध्ये गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. सीमोल्लंघनानंतर भाविकांनी आपट्याची पाने एकमेकांना देत आलिंगन आणि गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आळंदीतील पद्मावतीदेवी मंदिरातही प्रथा-परंपरांचे पालन करीत नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. आळंदी देवस्थानच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. दहा दिवसांच्या उत्सवात भाविकांना, विशेषतः महिला आणि पुरुषांना, कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले.
श्रीरामाच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात प्रस्थान
श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्टच्या श्रीराम मंदिरातून श्रीरामाची पालखी हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी माजी ज्येष्ठ विश्वस्त बिपीन चौबे, प्रमुख विश्वस्त ॲड. राहुल आवेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, चिन्मय चौबे, रमेश मसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, महेश आयचित, सेवक लक्ष्मण मेदनकर, राजेंद्र जाधव, सचिन तापकीर, डी. डी. घुंडरे पाटील, योगेश आरू, गोविंद ठाकूर पाटील, विश्वकर्मा महाराज पांचाळ, स्वकाम सेवा मंडळाचे सेवक, शिवतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे साधक तसेच विविध वारकरी शिक्षण संस्थांतील साधक आणि मान्यवर उपस्थित होते. विविध धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भैय्या वाघमारे, उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, सतीश कुऱ्हाडे, उमेश कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, योगीराज कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, नरहरी महाराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांच्या नियोजनामुळे पालखी सोहळा सुरळीत
आळंदीतील विविध पालखी मिरवणुकांचे मार्ग आणि प्रस्थानाची ठिकाणे वेगवेगळी असल्याने आळंदी पोलिस ठाण्याच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके आणि पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी बैठक घेऊन पालखी मार्गांवर पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही. पोलिसांच्या नियोजनामुळे श्रींच्या पालख्यांची मिरवणूक हरिनामाच्या गजरात सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडली.

