-पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्या; जिल्हा काँग्रेसची मागणी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : काही बँकांकडून अन्य बँकेचे कर्ज किंवा जमिनीवरील कर्जबोज्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. लीड बँकेच्या निर्देशांनंतरही काही ठिकाणी अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बँकांवर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करावी, चांगले उत्पादन घ्यावे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, अशी अपेक्षा असते. मात्र, त्याच शेतकऱ्यांना हक्काच्या पीककर्जासाठी बँकांच्या उंबरठ्यावर वारंवार चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब चिंताजनक आहे. पतसंस्था किंवा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे कर्ज थकीत असल्याचे अथवा सिबिल स्कोअर कमी असल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना नवीन पीककर्जापासून वंचित ठेवले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्य बँकेकडे पीककर्ज थकीत नसताना किंवा सुरू नसताना केवळ वैयक्तिक कर्जाचे कारण देऊन शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
लीड बँकेच्या निर्देशांनंतरही पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळविताना अडचणी येत असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने चौकशी करावी. तसेच पीककर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील अवचार, आमदार धीरज लिंगाडे, सभापती समाधान सुपेकर, देवानंद पवार, रिजवान सौदागर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अॅड. मोहतेश्याम रजा, इरफान पठाण, चित्रांगण खंडारे, भारत ठेंग, अनिल वारे, राजेश मापारी, विठ्ठलराव चव्हाण, पंडितराव चाटे, साहेबराव पाटोळे, नामदेवराव राठोड, शिवाजी सुसर, सूरज सोनुने, ज्येष्ठ नेते शेषराव पाटील सावळे, रमेश कायंदे, दत्ताभाऊ काकस, बबलू कुरेशी, सचिन जाधव, सुनील कळस्कर, राजू जाधव, विजय निकाळजे, डॉ. इसरार, रामदास डोईफोडे, सैय्यद अन्सार, माऊली लोणार, तुकाराम चव्हाण, डॉ. पुरुषोत्तम देवकर, रामभाऊ जाधव, सचिन बोंद्रे, ईश्वरराव इंगळे, काशीनाथ बोंद्रे, डॉ. पी. एस. वायाळ, डिगांबर देशमाने, गजनफर खान, प्रशांत भटकर, गोपाल देव्हडे, उबेद अली उर्फ भाईजान, अमिन भाई, खलील बागवान, प्रदीप पचेलवाल, एकनाथ चव्हाण, आनंद बोंद्रे, मो. शफी, डॉ. घुगे, अश्विन जाधव, गोकुळ शिंगणे, सुनील तायडे, नितीन गायकवाड, अमोल लहाने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने बँकांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा : प्रकाश पाटील
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बँकांचे अधिकारी, लीड बँकेचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पीककर्ज अर्जांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रकरणे, कर्ज नाकारण्याची कारणे आणि कर्जमंजुरीतील विलंब यांचा सविस्तर आढावा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.

