डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ प्रदान

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-भारुड या प्रबोधनात्मक लोककलेतील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल; केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान

आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्राच्या लोककलेसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तथा प्रसिद्ध कीर्तनकार, भारुडकार आणि प्रवचनकार डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ सोमवारी (दि. १९) प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील रवींद्र भवनमधील मेघदूत थिएटरमध्ये हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते डॉ. देखणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यंदा अकादमीच्या वतीने २०२४ सालासाठी देशभरातील एकूण ५१ कलाकारांना, तर २०२५ सालासाठी ५५ कलाकारांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२४ च्या पुरस्कारांमध्ये लोककला प्रकारात महाराष्ट्रातून डॉ. भावार्थ देखणे यांना ‘भारुड’ या प्रबोधनात्मक लोककलेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. भारुडाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा आणि लोकप्रबोधनाचा वारसा देशभरात तसेच परदेशात पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या सन्मानाबद्दल आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी डॉ. भावार्थ देखणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Exit mobile version